पांढरकवड्यात स्वच्छतेचा बोजवारा; डेंग्यू, मलेरिया अन् हगवण-डायरियाच्या वाढत्या धोक्याने नागरिकांमध्ये भीती

जन बदलाव / प्रतिनिधि

रोज ५०० ते ६०० रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात; नगर परिषदेने तातडीने उपाययोजना कराव्यात – युवा टायगर फोर्स

पांढरकवडा, दि. २८ जुलै :

पांढरकवडा शहरातील स्वच्छता व्यवस्था गंभीरपणे ढासळल्याचा आरोप करत युवा टायगर फोर्सने नगर परिषद प्रशासनाकडे तातडीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. शहरात तुंबलेले नाले, साचलेले सांडपाणी, रस्त्यांवरील कचऱ्याचे ढिगारे, वाढता डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छ वातावरणामुळे डेंग्यू, मलेरिया, व्हायरल ताप यांसह हगवण (डायरिया) साथीचा धोका वाढत असल्याचा दावा संघटनेने केला आहे.

युवा टायगर फोर्सचे संयोजक अंकित नैताम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील नागरिकांकडून सातत्याने स्वच्छतेबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात दररोज सुमारे ५०० ते ६०० रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे सांगितले जात असून, वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही परिस्थिती गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

आषाढी एकादशी निमित्त आयोजित ऐतिहासिक पांढरकवडा–केळापूर पायी वारी पालखी सोहळ्यापूर्वी नगर अभियंता, आरोग्य निरीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांसह पालखी मार्गाची संयुक्त पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी नाल्यांची साफसफाई, कचरा हटविणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, फॉगिंग, जंतुनाशक फवारणी आणि विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अपेक्षित प्रमाणात कामे पूर्ण झाली नसल्याचा आरोप युवा टायगर फोर्सने केला आहे.

संघटनेने यापूर्वीही अनेक वेळा नगर परिषदेला लेखी निवेदने दिली, अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली, प्रत्यक्ष पाहणी केली आणि लोकशाही मार्गाने आंदोलने केली. तरीही शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नात अपेक्षित सुधारणा झालेली दिसून येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

युवा टायगर फोर्सने महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगर अधिनियम, १९६५, घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित वैधानिक जबाबदाऱ्यांनुसार तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित प्रकरणाची चौकशी करून कर्तव्यात कसूर झाल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

अंकित नैताम यांनी सांगितले की, “नागरिकांचे आरोग्य सर्वोच्च आहे. शहरात तातडीने सर्वसमावेशक स्वच्छता मोहीम, नियमित फॉगिंग, जंतुनाशक फवारणी, नाल्यांची साफसफाई आणि कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबविण्यात यावे. प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर नागरिकांच्या हितासाठी न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्यात येईल. तसेच लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन व ‘कुलूप ठोको’ आंदोलन करण्यात येईल.”

युवा टायगर फोर्सने शहरातील सर्व नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, नगर परिषद प्रशासनानेही सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Leave a Comment