जन बदलाव / प्रतिनिधि
पाटणबोरी : केळापूर तालुक्यातील सायखेडा मध्यम प्रकल्प २२ जुलै २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजेपर्यंत ९४.४० टक्के भरला असल्याची माहिती पाटबंधारे उपविभाग क्रमांक ५, पांढरकवडा यांनी दिली आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी मुसळधार पाऊस झाल्यास धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता असून, त्यानंतर अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करावा लागू शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग क्र. ५, पांढरकवडा यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, केळापूर यांना याबाबत पत्र पाठवून आवश्यक खबरदारी घेण्याची विनंती केली आहे. संबंधित शाखा अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार प्रकल्पाची जलसाठा पातळी झपाट्याने वाढत आहे.प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पुढील काही दिवसांत जोरदार पाऊस झाल्यास धरण शंभर टक्के भरू शकते. अशा परिस्थितीत अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करावा लागल्यास नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.नदीला पूर आल्यास सायखेडा, लिंगती, मोरवा, पिंपरी, आकोली, पांढरकवडा, केळापूर, तातापूर, झुंजारपूर, ढोकी, सावरगा, वलगावपूर, वाघना, कवठा आणि पाटणबोरी या नदीकाठच्या गावांवर परिणाम होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर कार्यकारी अभियंता, तहसील कार्यालय, पांढरकवडा पोलीस स्टेशन, नगर परिषद पांढरकवडा तसेच संबंधित पाटबंधारे शाखा अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून आवश्यक ती पूर्वतयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबाबतची माहिती वेळोवेळी प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांना आवाहन
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहून आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करावे आणि आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतरासाठी तयार राहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.









