जन बदलाव / प्रतिनिधि
महागाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई; राहत्या घरातून लाचेची रक्कम जप्त
यवतमाळ : जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी मोठी कारवाई करत अंगणवाडी मदतनीस पदावर निवड करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, श्रीमती शकुंतला जयवंत इंगोले (वय ५७), पर्यवेक्षिका तथा अतिरिक्त कार्यभार बाल विकास प्रकल्प अधिकारी, वर्ग-३, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महागाव यांनी तक्रारदार महिलेकडून लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार (वय २१ वर्षे) यांनी अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केला होता. संबंधित पदावर निवड करून देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने १० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
यानंतर २२ जुलै २०२६ रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत आरोपीने तडजोडीअंती प्रथम हप्ता म्हणून ५ हजार रुपये तत्काळ आणि उर्वरित ५ हजार रुपये काम पूर्ण झाल्यानंतर स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर एसीबीने नियोजनबद्ध सापळा रचला. तक्रारदार महिलेला पंचांच्या उपस्थितीत आरोपीच्या महागाव येथील राहत्या घरी पाठविण्यात आले. आरोपीने आपल्या घरातील स्वयंपाकघरात तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तात्काळ धाड टाकून आरोपीला रंगेहात ताब्यात घेतले.
तपासादरम्यान स्वयंपाकघरातील गॅस ओट्याखालील पहिल्या कप्प्यात ठेवलेली ५ हजार रुपयांची लाचेची रक्कम जप्त करण्यात आली. संपूर्ण कारवाईची व्हिडिओग्राफी करण्यात आली असून आरोपीच्या राहत्या घराची झडतीही घेण्यात आली.
या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ (सुधारित) च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, पोलीस निरीक्षक मनोज ओरके, पोलीस हवालदार अतुल मत्ते, अब्दुल वसीम, सुधीर कांबळे, पोलीस शिपाई आकाश सहारे, सूरज मेश्राम, सतीश सोनोने, इफाजोद्दीन काझी, महिला पोलीस शिपाई मनीषा राजुरकर, सरिता राठोड तसेच चालक दिनेश सरोदे आणि अतुल नागमोते यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, दगडी इमारत, टांगा चौक, यवतमाळ येथे संपर्क साधावा. तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवून त्वरित कारवाई केली जाईल. तसेच सापळा कारवाईत वापरण्यात आलेली रक्कम एका महिन्याच्या आत परत करण्यात येईल आणि संबंधितांचे वैध शासकीय काम पूर्ण करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे विभागाने स्पष्ट केले आहे. 









