जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा

जन बदलाव / प्रतिनिधि

“विद्यार्थ्यांवर हात उचलाल तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही”; केंद्र सरकारवर जोरदार टीका

यवतमाळ : दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भेट देत पाठिंबा जाहीर केला. आंदोलनाचे प्रमुख अभिजीत दिपके यांची भेट घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी आंदोलन शांततेत पण ठामपणे सुरू ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करत विद्यार्थ्यांवरील कोणत्याही बळाच्या वापरास तीव्र विरोध दर्शविला.

जंतर-मंतर येथे विविध राज्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी भाषण केले. अनेक अमराठी विद्यार्थ्यांनी त्यांना हिंदीत बोलण्याची विनंती केली. मात्र, “मला हिंदी नीट बोलता येत नाही. माझ्या मोडक्या-तोडक्या हिंदीमुळे तुम्ही तुमची हिंदी विसराल,” असे मिश्कील उत्तर देत त्यांनी उपस्थितांमध्ये हास्याची लकेर निर्माण केली. त्यानंतर त्यांनी मराठीत भाषण केले, तर अभिजीत दिपके यांनी त्याचे हिंदीत भाषांतर करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले.विद्यार्थ्यांना संबोधित करताना जरांगे पाटील म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत आंदोलनस्थळ सोडू नका. आंदोलन शांततेत आणि संयमाने सुरू ठेवा. जर आंदोलन कमकुवत झाले किंवा आंदोलनस्थळ रिकामे झाले, तर त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकजूट कायम ठेवून आपल्या मागण्यांसाठी संघर्ष सुरू ठेवावा.भाषणादरम्यान त्यांनी केंद्र सरकारवर टीका करत, सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांशी संवेदनशीलतेने वागण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी असा आरोप केला की, सरकारने आंदोलनांकडे दडपशाहीच्या दृष्टीने पाहू नये. विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा बळाचा वापर झाल्यास त्याला तीव्र विरोध केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील आंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनाची आठवण करून दिली. त्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईचा उल्लेख करत, अशा घटना पुन्हा घडू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाचा आदर केला गेला पाहिजे, असे ते म्हणाले.विद्यार्थ्यांच्या एकजुटीचे कौतुक करत जरांगे पाटील म्हणाले की, देशभरातील नागरिक या आंदोलनाकडे लक्ष ठेवून आहेत. विद्यार्थ्यांनी धैर्याने आणि शांततेच्या मार्गाने आपला लढा सुरू ठेवावा. न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही पद्धतीने सुरू असलेल्या संघर्षाला व्यापक पाठिंबा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.जंतर-मंतरवरील या भेटीनंतर विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले. विविध राज्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Comment